राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रथेप्रमाणे अभिभाषणाला सुरुवात केली, मात्र सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी सुरू केल्यानं अवघ्या दोन तीन मिनिटातच त्यांनी भाषण आटोपतं घेतलं. राज्यपाल निघून गेल्यावरही घोषणाबाजी चालूच होती. राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू म्हणून केल्यानं सत्ताधारी सदस्य, राज्यपालांचा विधानभवनात प्रवेश झाल्यापासूनच आक्रमक झाले होते. ते सभागृहात येताच घोषणा चालू झाल्या. विधानपरिषदेचं कामकाज आज वंदे मातरम नं सुरु झालं. कामकाज सुरू होताच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या बाबतचा मुद्दा उपस्थित करायचा प्रयत्न केला मात्र याला अनुमती नसल्याचं सांगत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दरेकर यांचं कोणतंही वक्तव्य नोंदीत घेतलं जाणार नाही असं स्पष्ट केलं. तरीही दरेकर बोलत राहिले तर विरोधी पक्ष सदस्य मलिक यांच्याविरोधात घोषणा देत हौद्यात जमा झाले. त्यांना जागेवर बसवा अन्यथा बाहेर काढावं लागेल अशी तंबी सभापतींनी दिली. याच गोंधळात सभापतींनी कार्यक्रम पत्रिकेवरील कार्यक्रम पूर्ण केला. भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज आणि दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून दिवसभरासाठी कामकाज स्थगित केल्याची घोषणा सभापतींनी केली. विधानसभेतही कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी, मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवण्यात आली असून, अभिभाषणाचा आभार प्रस्ताव मांडण्यात आला. मलिक यांच्या मुद्द्यावरून चर्चेची मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी गदारोळ करत महाविकास आघाडी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या गदारोळातच अर्थमंत्री अजित पवार यांनी ६ हजार २५० कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.