महिलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात आज भारताचा पराभव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, आज न्यूझीलंडनं भारताला ६२ धावांनी पराभूत केलं. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं पहिलं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडच्या आघाडीच्या खेळाडूंनी दमदार फलंदाजी केल्यानं, न्यूझीलंडला निर्धारित ५० षटकांत ९ गडी बाद २६० धावांची मजल मारता आली. न्यूझीलंडच्या अॅमिला केर आणि अॅमी सॅटर्थवेट यांनी अर्धशतकी खेळी केली, तर भारताच्या पुजा वस्त्रकार हीनं न्यूझीलंडचे चार खेळाडू बाद केले.विजयासाठी २६१ धावांचा पाठलाग करतांना, हरमनप्रित वगळता, भारताच्या इतर खेळाडू फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव ४६ षटकं आणि ४ चेंडूत  १९८ धावांतच आटोपला. हरमनप्रित हीनं ७१ धावा केल्या, तर न्यूझीलंडच्या ली ताहूहू आणि अॅमिला केर यांनी भारताचे प्रत्येकी ३ खेळाडू बाद केले.अॅमी सॅटर्थवेट हीला सामनावीरच्या पुरस्कारानं गौरवलं गेलं. या पराभवामुळे गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर गेला आहे. भारताचा यापुढचा सामना येत्या १२ मार्चला वेस्ट इंडीज सोबत होणार आहे.