प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महीने मुदतवाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महीने म्हणजेच, सप्टेंबर 2022 पर्यंत (सहावा टप्पा) मुदतवाढ केंद्र सरकारनं दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं या मुदतवाढीला मंजुरी दिली. आता कोविडची लाट नियंत्रणात येत असली, आणि देशभरात सर्व आर्थिक व्यवहारांनाही गती मिळाली असली, तरीही आर्थिक व्यवस्था सुरळीत होण्याच्या काळात, एकही गरीब कुटुंब उपाशी राहू नये यासाठी, हा निर्णय घेतला आहे.

या सहा महिन्यात, प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्यासाठीच्या रेशनच्या धान्याव्यतिरिक्त दरमहा माणशी आणखी पाच किलो धान्य दिलं जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला, त्यांच्या नेहमीच्या धान्याच्या दुप्पट धान्य मिळणार आहे. या योजनेचा पाचवा टप्पा या महिनाअखेरीला संपणार आहे. एप्रिल 2020 पासून सुरु झालेली ही जगातली सर्वात मोठी अन्नसुरक्षा योजना आहे. सरकारनं आतापर्यंत या योजनेवर 2 लाख 60 हजार कोटी रुपये निधी खर्च केला असून, पुढच्या सहा महिन्यांसाठी, आणखी 80 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत, 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्यवाटप केलं जाणार आहे.