महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण घटलं नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण घटलं नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अवैध गर्भलिंग निदानाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना टोपे यांनी सभागृहात आकडेवारीही सादर केली. २०१६ मधे नागरी नोंदणी प्रणालीच्या अहवालानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात जन्माच्या वेळी असलेल्या मुलामुलींच्या गुणोत्तरात एक हजार मुलांमागे ८७४ मुली होत्या तर २०१९ मधे हे प्रमाण एक हजार मुलांमागे ९१३ मुलींवर गेले आहे. त्यामुळे मुलींचे प्रमाण उस्मानाबादमधे घटलेले नाही, असं आरोग्यमंत्रांनी सांगितलं. राज्यात दर हजार मुलांमागे हजार मुली असाव्यात, हे उद्दिष्ट गाठण्याचा राज्याचा प्रयत्न असून याकरता सर्वसामान्य जनतेची मानसिकता बदलण्यासाठी जनजागरण करण गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. 

राज्यात २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या महिन्याभराच्या कालावधीत गर्भलिंग निदान चाचणीसंदर्भातल्या कायदेशीर तरतुदींचा भंग होत असल्यावरून १८१ सोनोग्राफी चाचणी केंद्रांना कारणे दाखवा नोटिस देण्यात आली असून तीन केंद्रांतली सोनोग्राफी मशिन्स सील केली आहेत, तसंच ७३ गर्भपात केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या असून त्यापैकी १५ केंद्रांची मान्यता रद्द करून ती बंद करण्यात आली आहेत, अशी माहितीही टोपे यांनी विधानसभेत दिली.  राज्यातली प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि ग्रामीण आरोग्य केंद्रांची दर्जोन्नती करण्याची घोषणाही टोपे यांनी केली.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचा एकविसावा वार्षिक वित्तीय अहवाल, गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा २०१९-२० चा वार्षिक लेखा अहवाल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा २०२०-२१च्या वार्षिक अहवालांसह अनुसूचित जाती कल्याण समिती, अनुसूचित जमाती कल्याण समिती आणि रोजगार हमी योजना समितीचा पहिला अहवालदेखील आज विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आले.