तांदुळ महोत्सवातून ४४० क्विंटल तांदुळ तसेच कडधान्याची विक्री ; ३१ लाख रूपयांची आर्थिक उलाढाल

 

पुणे : पुणे महानगरात भरलेल्या तांदुळ महोत्सवामध्ये शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेतून ४४० क्विंटल तांदुळ, नाचणी, गहू, ज्वारी बाजरी, कडधान्य व डाळी इत्यादी शेतमालाची विक्री व त्यामधुन ३१ लाख रूपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.बी.बोटे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या शेतातील उच्च दर्जाचा अस्सल इंद्रायणी, आंबेमोहर व स्थानिक वाणांचा तांदुळ, नाचणी, कडधान्ये व इतर शेतमाल शेतकऱ्यांकडून थेट पुणे शहरातील नागरिकांना रास्त दरात उपलब्ध व्हावा, तसेच या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ घेता यावा आणि शेतकरी गटांना उत्पादीत शेतमालाच्या विक्रीतून योग्य तो आर्थिक मोबदला मिळावा, या हेतुने १३ ते १५ मार्च या कालावधीत कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने आयोजित तांदुळ महोत्सवाला ग्राहकांनी चांगली पसंती दिली आहे.

महोत्सवात शेतकऱ्यांच्या शेतीत पिकविलेला उच्च दर्जाचा अस्सल इंद्रायणी, हातसडीचा तांदुळ, आंबेमोहर व स्थानीक वाणांचा तांदुळ, नाचणी, कडधान्य व सेंद्रिय पध्दतीने पिकविलेला गहू, बाजरी, ज्वारी व इतर शेतीमाल शेतकऱ्यांकडून थेट पुणे शहरातील नागरीकांना रास्त दरात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. पहिल्या दिवसापासून ग्राहकांनी कुटुंबासह एकत्र येवून चांगला प्रतिसाद दिल्याने तांदळाची मोठ्या प्रमाणात विक्रीची नोंद झाली आहे.