महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपाने स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी सक्षमपणे पुढे नेला. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वाभिमानी’ विचारच प्रेरक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्मृतिदिनानिमित्त कृज्ञतापूर्वक वंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी महाराष्ट्राला  शौर्य, स्वाभिमान, स्वराज्यबाणा आणि पुरोगामी विचार दिला. त्यांचे संघर्षमय जीवन आपणा सर्वांसाठी ऊर्जास्रोत आहे. कुशल राज्यकारभार, युद्धनीतीबरोबरच त्यांनी बुधभूषण, नखशिख, नायिकाभेद, सातसतक हे ग्रंथ लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्यावर आलेल्या संकटाचा त्यांनी मोठ्या धैर्याने सामना केला. स्वराज्याचे रक्षण करतानाच त्यांनी स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या. आपल्या कार्यकाळात छत्रपती संभाजी महाराज एकही युद्ध हरले नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्यातील रयतेला स्थैर्य प्राप्त झाले, स्वराज्याला सक्षम छत्रपती मिळाले, स्वराज्याच्या शत्रूंवर वचक बसला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या शिकवणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार केला. रयतेसाठी आणि स्वराज्याच्या स्वाभिमानासाठी त्यांनी समर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्श विचारांवर मार्गक्रमण करत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन केले आहे.