चंद्रपुरात ४३ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस तापमानाची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या २ दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. चंद्रपुरात काल ४३ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. देशाच्या उत्तर भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे ही तापमान वाढ होत आहे. वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी नागरिकांचे विविध उपाय सुरू आहेत.

पुढचे काही दिवस तापमान वाढीचा अंदाज पाहता नागरिकांनी उन्हापासून स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. विदर्भातली शहरं सध्या अधिक तापमानाची होऊ लागली आहेत. जगातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या उष्ण शहरात चंद्रपूरचा समावेश झाला आहे. जळगावात पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला आहे. अमळनेर तालुक्यात मांडळ इथं एका ३३ वर्षीय तरुणाचा काल संध्याकाळी उष्माघातानं मृत्यू झाला. लाहीलाही करणारा हा उष्णतेचा कहर २ एप्रिलपर्यंत कायम राहील, असं जिल्हा प्रशासनानं एका पत्रकाद्वारे सांगितलं आहे.