उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधल्या ९ जिल्ह्यांमधल्या एकूण  ५५ जागांसाठी ५८६ उमेदवार रिंगणात असून  १ कोटी ८ लाख पुरुष, ९४ लाख महिला तर  १ हजार २६९ तृतीयपंथी मतदार आज आपला हक्क बजावतील. यासाठी उभारण्यात आलेल्या एकूण २३ हजार ४०४ मतदान केंद्रांपैकी २५२ आदर्श केन्द्र आहेत तर १२७ केंद्रांवर केवळ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सहारनपूर, बिजनोर, अमरोहा, मोरादाबाद, रामपूर, बरेली, शाहजहांपूर, बदायून आणि संभल या जिल्ह्यांमध्ये आज दुसऱ्या टप्यातलं मतदान होत असून समाजवादी पार्टीचे नेते मोहम्मद आझम खान, उत्तरप्रदेशचे माजी मंत्री धरम सिंग सैनी, धर्म पाल सिंग,  सध्याच्या सरकारमधले मंत्री सुरेश खन्ना, बलदेव औलख आणि अन्य उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंदिस्त होईल. 

उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांसाठी आज सकाळी ८ वाजता  शांततेत मतदान सुरु झालं. उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल निवृत्त  गुरमीत सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरमीत कौर यांनी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही बळकट करण्यासाठी  राज्यातल्या प्रत्येक नागरिकाचं मत मोलाचं असल्याचं सांगून त्यांनी जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी देखील आपल्या पत्नीसह आज सकाळी आपलं मत नोंदवलं. 

गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठीचं एका टप्प्यातलं  मतदान आज सकाळी ७ वाजता कडक बंदोबस्तात सुरु झालं.  यासाठी एकूण  १ हजार ७२२ मतदान केंद्र उभारण्यात आली असून यापैकी ५० केंद्रांवर केवळ महिला अधिकारी असतील तर काही केंद्रांवर दिव्यांग अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.  ११ लाख ६४ हजार २२४ पेक्षा जास्त मतदार आज आपला कल नोंदवतील. निवडणुकीसाठी एकूण ३०१ उमेदवार रिंगणात असून यापैकी २६ महिला उमेदवार आहेत.


Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image