राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईतल्या राजभवनातल्या नवीन दरबार हॉलचे उद्घाटन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मुंबईतल्या राजभवनातल्या नवीन दरबार हॉलचे उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र ही अध्यात्मिक तसंच अन्यायाविरुद्ध शौर्यानं लढणाऱ्यांची. देशभक्तांची भूमी आहे. या भूमीत अनेक संत - महात्मे होऊन गेले. राज्याला कला, संस्कृती आणि इतिहासाचा मोठा वारसा लाभला आहे. महाराष्ट्र हे एक महान राज्य आहे, असं राष्ट्रपती यांनी यावेळी सांगितलं.
सुरुवातीला त्यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. राज भवन हे लोकभवन व्हावे अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्या कार्यकाळात २३ हजारांहून अधिक आदिवासी व्यक्तींना निवारा दिला, दुर्गम भागातल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. दरबार हॉलचा जुना वारसा जपून ही नवी वास्तू उभारली आहे. हा वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे चाललो आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पारतंत्र्यांच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासही सज्ज झाली आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान राष्ट्रपती उद्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबडवे, या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाला भेट देणार आहेत. आंबडवे गावाला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती ठरणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या निमित्तानं विभागीय आयुक्त विलास पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉक्टर बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेसह सर्व सुविधांचा आज आढावा घेण्यात आला. राष्ट्रपतींचा दौरा सुरळित आणि शांततेत पार पडेल, असा विश्वास रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहितकुमार गर्ग यांनी व्यक्त केला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.