यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचे लिलाव पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचे लिलाव काल बेंगळुरुमध्ये पार पडले. अनेक तरुण क्रिकेटपटूंना यावेळी भरघोस बोली लागली. सर्वाधिक बोली लागलेल्या ११ खेळाडूंमधले ७ भारतीय आहेत. या लिलावात एकूण २०४ खेळाडूंवर साडे ५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची बोली लागली. 

मुंबई इंडियन्सनं इशान किशनसाठी सर्वाधिक सव्वा १५ कोटी रुपयांची बोली लावली. २०१५ मधल्या लिलावातल्या युवराज सिंगनंतरचा तो दुसरा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. दीपक चहरला १४ कोटींमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं आपल्या संघात सामावून घेतलं. तो आतापर्यंत सर्वात महागडा भारतीय जलदगती गोलंदात ठरला आहे.

दिल्ली कॅपिटल्स पुन्हा संघात घ्यायला तयारी न दर्शवल्यानं श्रेयस अय्यरला सव्वा १२ कोटींमध्ये कोलकता नाइट रायडर्सनं संघात घेतलं. सर्वाधिक बोली लागलेल्या ५ खेळाडूंमध्ये इंग्लंडचा लियाम लिविंगस्टोन हा एकमेव परदेशी खेळाडू आहे. त्याला पंजाब किंग्जनं त्याच्यावर साडे ११ कोटींची बोली लावली. शार्दुल ठाकूरसाठी दिल्ली कॅपिटल्सनं पावणे ११ कोटींची बोली लावली.