सरकारनं प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला दोन दिवसांचा संप मागं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी मध्यस्थी करत, कर्मचाऱ्य़ांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळे हा संप मागे घेतला असल्याचं राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं जाहीर केलं.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत संघटनेच्या शिष्टमंडळानं काल अजित पवार आणि मुख्य सचिव देवाषिश चक्रवर्ती यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी केलेल्या आवाहनामुळे संप मागं घेतला आहे. महिनाभरात तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, चालढकल झाली तर पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उगारावे लागेल, अशा इशारा संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिला आहे. निवृत्तीचं वय ६० वर्षे करावं आणि जुनी पेंशन योजना लागू करावं, या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.