ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं काल मध्यरात्रीच्या सुमाराला निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या जुहूच्या क्रिटी केअर रूग्णालयात रुग्णालयात उपचार सुरू होते. झोपेत श्वास घेताना त्रास होण्याची समस्या त्यांना वर्षभरापासून भेडसावत होती. त्यातच त्यांच्या छातीत संसर्ग झाला होता. त्यामुळं गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बरं वाटू लागल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्रास जाणवल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथंच त्यांनी रात्री पावणेबाराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उद्या मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत बप्पी लहरी आवाजाच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असून एक काळ त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमुळे गाजला होता.
१९७३ ला हिंदी चित्रपटसृष्टीत 'नन्हा शिकारी' या चित्रपटातून बप्पी लहरी यांची कारकीर्द सुरू झाली. जख्मी या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदाच गायनही केलं आणि संगीतही दिलं. लोकप्रिय झालेला हा त्यांचा पहिला चित्रपट.
त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून उत्तम कामगिरी केली. डिस्को संगीत भारतीय चित्रपट सृष्टीत आणणारे म्हणून बप्पी लहरी ओळखले जातात. मिथुन चक्रवर्ती यांच्या 'डिस्को डान्सर' या चित्रपटासाठी दिलेल्या संगीतानं बप्पी लहरी यांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली. 'आय एम ए डिस्को डान्सर', 'दे दे प्यार दे', 'आज रपट जाये तो', 'थोडीसी जो पी ली है', 'यार बिना चैन कहा रे', 'इंतहा हो गयी इंतजार की', 'चलते चलते मेरे ये गीत याद रखना' ही बप्पी लहरी यांची गाजलेली गाणी. महंमद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या अनेक महान गायकांसोबत त्यांनी काम केलं होतं. अनेक रियलिटी शो मध्ये त्यांनी परीक्षक म्हणून सहभाग नोंदवला. १९९० साली आलेल्या ‘डोक्याला ताप नाही’ या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात त्यांचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बप्पी लहरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बप्पी लहरी हे असामान्य प्रतिभेचे गायक आणि संगीतकार होते. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय ठरल्याचं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
बप्पी लहरी यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचं उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
बप्पी लहरी त्यांच्या संगीतामधून सर्व प्रकारच्या भावनांची सुंदर रीतीनं अभिव्यक्ती झाली तसंच सर्व वयोगटातल्या श्रोत्यांना ते आपलंसं वाटलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मनस्वी, निखळ असा गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनानं काळानं हिरावून नेला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे ते अजरामर राहतील अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बप्पी लहरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
बप्पी लहरी यांच्या निधनानं भारतीय संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
बप्पी लहरी यांचा आवाज आणि संगीत अजरामर राहील असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.
बप्पी लहरी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आपण अनेक गाणी गायली . त्यांचा हसरा चेहरा कायम स्मरणात राहील अशा शब्दात ज्येष्ठ पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांनी शोक व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, संगीतकार ए. आर. रेहमान, अभिनेता संजय दत्त यांनीही बप्पी लहरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांच्यावर आज दुपारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र बाप्पा लहरी यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी अभिनेते शक्ती कपूर, संगीतकार ललित पंडित, अभिनेत्री विद्या बालन, गायक शान यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.