नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी पुकारलेला संप मागे

मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. एपीएमसी प्रशासनाच्या पुढाकाराने व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीत यावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला.

या बैठकीत माथाडी कामगारांनी ५३ किलोपर्यंतच्या गोणी उतरवायला मान्यता दिली आहे. तसंच ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी मागवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचं  आश्वासन बाजार समिती प्रशासनानं दिलं आहे.

कांदा बटाटा मार्केटमध्ये संपूर्ण देशभरातून मालाची आवक होत असते, काहीवेळा ६० किलोपर्यंत वजनाच्या गोणी असतात. माथाडी कामगारांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असल्यानं  ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी उचलायला माथाडी कामगारांनी नकार दिला होता.