कोरोना प्रतिबंधक लशींच्या १५२ कोटींहून अधिक मात्रांचा देशवासियांना लाभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत १५२ कोटींहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देऊन झाल्या आहेत. यातल्या २९ लाख ६० हजारपेक्षा जास्त मात्रा काल दिवसभरात देण्यात आल्या. गेल्या २४ तासात कोविड संसर्ग झालेले एक लाख ७९ हजार नवे रुग्ण आढळले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ७ लाख २३ हजारावर पोहोचली आहे. काल दिवसभरात ४६ हजार ५६९ रुग्ण कोविडमुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ६२ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ३ कोटी ४५ लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात ओमायक्रॉनची लागण झालेले ४ हजार ३३ रुग्ण आतापर्यंत आढळले असून त्यातले एक हजार ५५२ बरे झाले आहेत. सर्वाधक एक हजार २१६ रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून राजस्थानात ५२९ तर दिल्लीत ५१३ रुग्ण आढळले आहेत. २७ राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमधे या आजाराचा प्रादुर्भाव आढळला आहे. देशभरात आतापर्यंत ६९ कोटी १६ लाखपेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी कोविडसाठी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाने दिली.