राज्यातल्या आतापर्यंत ६४ हजारांहून अधिक मुलामुलींनी घेतली कोविड प्रतिबंधक लस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातही आज सर्व जिल्ह्यांमध्ये किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठीच्या  कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा  केंद्रीय आरोग्य  राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी उपस्थित होते.नाशिक महापालिका हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील तब्बल एक लाख किशोरवयीन मुलांचं  कोरोना प्रतिबंधक लसीकरण केलं  जाणार आहे. सहा केंद्रांवर प्रत्येकी ३०० मात्रा उपलब्ध करून दिल्या  जाणार असून प्रत्येकी १०० मात्रा  ऑनलाईन नोंदणी केलेल्यांसाठी राखीव असणार आहेत. जालना जिल्ह्यात १५ ते १८वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी  कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आरंभ, आरोग्य  मंत्री आणि पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज जिल्हा महिला रुग्णालयात झाला.  यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल आणि आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

बीड शहरामध्ये सावरकर विद्यालय, जिल्हा रूग्णालय, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, यासह इतर काही ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आज सकाळपासूनच  लसीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली . लसीकरण झालेल्या काही विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया  व्यक्त करत इतरांना देखील लस घेण्याचं आवाहन केलं आहे. हिंगोली जिल्हयात प्रत्यक्ष शाळेत जाऊन लसीकरण केलं  जात आहे. जिल्ह्यातील ३७० शाळेतील ५८ हजार लाभार्थ्यांचं  लसीकरण केलं जाणार आहे. आज हिंगोली शहरातील सरजूदेवी कन्या विद्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरवात झाली. प्रत्येक शाळेत जाऊन लाभार्थ्यांना लस दिली जाणार असून लाभार्थ्यांनीही स्वतःहून लसीकरण करून घ्यावं  असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यात  ७५ केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात जडली.   काल संध्याकाळपर्यंत  लसीच्या ७५ हजार मात्रांचं वितरण या केंद्रांवर झालं होतं. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात दहा रुग्णालयांमार्फत लसीकरण केलं जात आहे. 

किशोरवयीन वयोगटातल्या मुलांसाठी नागपूर शहरात ४७ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ६५ केंद्रावर ही लसीकरण मोहीम राबविली जात आहे. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांचा हस्ते या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 10 हजार मुलांनी ऑनलाइन नोंदणी करून  लसीकरणासाठी उत्साह दाखवला.  नागपूरात २ लाख ४८ हजार २६६ मुलांना लस दिली जाणार असून यासाठी पालक, मुलांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती ही करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा आरंभ, एका शाळेत शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांच्या हस्ते झाला. यावेळी मुलांचा लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं. भंडारा जिल्ह्यात लसीकरणाची सुरुवात लाखनी इथल्या ग्रामीण रुग्णालयातून करण्यात आली. यावेळी तहसीलदार महेश शितोळे उपस्थित होते. तुमसर तालुक्यात तहसीलदार. बी. डी टेळे यांच्या हस्ते शारदा विद्यालयात मुलांच्या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी लसीकरण संदेश देणारी रांगोळी विद्यार्थ्यांनी  लसीकरण केंद्राच्या आवारात काढली होती.तर कोविड लसीकरणाचं महत्व सांगणारं पाथनाट्या यावेळी सादर करण्यात आलं.

गोंदिया जिल्यात देखील पहिल्याच दिवशी ४९ केंद्रावर मुलांचं लसीकरण सुरु करण्यात आलं  असून जिल्यातील ६८ हजार ३२१ लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातही 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणार्कला सुरुवात झाली असून  जिल्ह्यात सध्या या वयोगटातील ६५  हजार १४० मुलं आहेत. जळगाव जिल्ह्यातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील सव्वा दोन लाख मुला-मुलींना कोविड- प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. या लसीकरणाला आज सुरूवात झाली. आज ५०० लाभार्थी मुलांच्या लसीकरणाचं नियोजन आहे.