देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १४६ कोटी ७० लाखाहून अधिक लसमात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १४६ कोटी ७० लाखाहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या. त्यातल्या ९९ लाख २७ हजार मात्रा काल देण्यात आल्या. देशभरात काल कोविडचे ३७ हजार ३७९ पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून सक्रीय रुग्णांची एकूण संख्या एक लाख ७८ हजार ५८२ झाली आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या एकोणपन्नास शतांश टक्के आहे. सुमारे ११ हजार ७ रुग्ण काल कोरोनामुक्त झाले, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला. आतापर्यंत ३ कोटी ४३ लाख ६ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सकारात्मक रुग्ण आढळण्याचा साप्ताहिक दर २ पूर्णांक ५ शतांश टक्के तर दैनंदिन दर ३ पूर्णांक २४ शतांश टक्के झाला आहे. देशभरात आतापर्यंत ६८ कोटी २४ लाख कोविड चाचण्या झाल्या, त्यातल्या ११ लाख ५४ हजार चाचण्या काल झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.