मुलींना सन्मानपूर्वक समान संधी मिळावी यावर सरकारचा कटाक्ष - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी बालिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुलींना समान संधी, पुरेसं पोषण आणि कामासाठी सुरक्षित वातावरण देण्याचा संकल्प सर्वांनी करावा असं आवाहन एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बालिका दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे की सरकारच्या दरएक पावलात नारीशक्तीची जोपासना या तत्वाला सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे. मुलींचं सक्षमीकरण, आणि त्यांना सन्मानपूर्वक समान संधी मिळावी यावर सरकारचा कटाक्ष आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे महिला विकासाच्या पुढे जाऊन महिला नेतृत्वाची संकल्पना सरकार राबवत असून देशाला गौरवास्पद कामगिरी अनेक क्षेत्रात मुली बजावत असल्याचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ट्विटरवर दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.