लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करा. लसीकरणाविषयी अफवा पसरू देऊ नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री उपस्थित होते. कठीण भौगोलिक परिस्थितीतही ग्रामीण भागात आणि दुर्गम भागात लसीकरण केलेल्या आशा कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं.

ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त असेल तिथे अधिकाधिक चाचण्या करा. स्थानिक पातळीवर निर्बंध लादा असं ते म्हणाले. गृह विलगीकरण वाढवून घरीच उपचार देणं कसं वाढवता येईल, यावर लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी केलं. आयुष काढा घेण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. औषध म्हणून नव्हे तर बचाव म्हणून हा काढा घ्यावा असं ते म्हणाले.