प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षा त्रुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबमधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या त्रुटींच्या चौकशीसाठी आज सर्वोच्च न्यायालयानं समितीची स्थापना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा या समितीच्या अध्यक्ष आहेत. सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या तीन सदस्यीय पीठानं समिती स्थापन केली. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक, पंजाबचे सुरक्षा महासंचालक आणि पंजाब तसंच हरयाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल या समितीचे इतर सदस्य आहेत. लॉयर्स व्हाइस या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी करताना न्यायालयानं समिती स्थापनेचे निर्देश दिले.