मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप

  मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील दुर्गम वाड्या-पाड्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून आज सुमारे 300 जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. भानशीला पाडा, पासपोली गाव, पाईपलाईन रोड, पेरूबाग, पासपोली मरोळ बामन पाडा, साकी विहार या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा यामध्ये समावेश आहे.

भारताच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये शासकीय यंत्रणांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश दिले होते. याचाच एक भाग म्हणून आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी 35 दाखल्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात भानशीला पाडा ठिकाणी वाटप करून कार्यक्रमास सुरूवात केली. उर्वरित दाखल्यांचे वाटप घरपोच करण्यात आले.

वाड्या-पाड्यातील दुर्गम आदिवासींना जातीचे दाखले मिळण्यास अडचण येते. अशिक्षितपणा असल्यामुळे त्यांच्याकडे पुरेसे पुरावे नसतात. त्यामुळे अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक पाऊल म्हणून सदर वाड्या-पाड्यांवर तहसीलदार व आदिवासी विकास विभागामार्फत शिबिरांचे आयोजन करून आदिवासी बांधवांकडून जातीच्या दाखल्याचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यामध्ये आदिवासी मंडळ, तरूण मंडळ व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग दर्शविला. या माध्यमातून एकूण 500 अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची छाननी करून व काही ठिकाणी पुरेसे पुरावे नसल्यास गृह चौकशी करून त्याठिकाणी राहणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींचे जवाब, पंचनामे घेऊन संबंधित व्यक्ती त्याठिकाणी पूर्वापार राहत आहे किंवा नाही याची खात्री करण्यात आली. अशा अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येऊन महसूल प्रशासनामार्फत या दाखल्यांचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाड्यांवरील लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

या कार्यक्रमप्रसंगी नगरसेविका चंद्रावती मोरे, कुर्ला तहसीलदार संदीप थोरात, अंधेरी तहसीलदार श्री.भालेराव, उपविभागीय अधिकारी पद्माकर रोकडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव सोनवणे, आदिवासी प्रकल्प विभागाच्या सुप्रिया पवार तसेच भानशीला पाड्यातील रवींद्र दोडिये, मीनाताई रावते, मनीष जनेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.