राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये आणि ध्वजविषयक आचारसंहितेचं पालन व्हावं याकडे लक्ष दिलं पाहिजे - केंद्रीय गृह मंत्रालय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये आणि ध्वजविषयक आचारसंहितेचं पालन व्हावं याकडे लक्ष दिलं पाहिजे असं केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. या संदर्भात सर्व मुख्य सचिवांना लिहीलेल्या पत्रात गृहमंत्रालयाने म्हटलं आहे की राष्ट्रध्वज हो देशातल्या जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतीक आहे. मात्र त्याचा उचित सन्मान राखण्याच्या दृष्टीनं केलेल्या नियमांबद्दल अद्याप जनजागृतीचा अभाव आहे. मोठ्या राष्ट्रीय, सांस्कृतिक किंवा क्रीडा सोहळ्यात ध्वजाच्या केवळ कागदी प्रतिकृतींचा वापर सर्वसामान्यांना करता येईल. तसंच हे कागदी झेंडे इतस्ततः पायदळी जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्यांची विल्हेवाट ध्वजविषयक संहितेचं पालन करुनच लावली पाहिजे असं गृहमंत्रालयाने बजावलं आहे.