प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज मेरठ इथं मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रीडा क्षेत्रात कारकिर्द घडवण्याचा विश्वास देशातल्या तरुणांमध्ये निर्माण व्हावा हाच आपला संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासाठीच आपण देशाच्या तळागाळापर्यंत खेळांविषयीच्या सोयीसुविधा पुरवणं आणि उभ्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथं मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली. त्यानंतर ते बोलत होते. मेरठ इथं उभ्या राहत असलेल्या क्रीडा विद्यापीठामुळे ही क्रांतीवीरांची नगरी अशी ओळख असलेलं हे शहर आता खेळाडूंची नगरी म्हणूनही आपली नवी ओळख निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विद्यापीठाच्या उभारण्यासाठी ७०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या क्रिडा विद्यापीठात हॉकीचं सिंथेटिक मैदान, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल तसंच कबड्डीसाठीचं मैदान, लॉन टेनिस कोर्ट, व्यायामशाळा, धावण्याच्या स्पर्धांसाठी सिंथेटिक स्टेडियम, जलतरण तलाव, शूटिंग, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन तसंच धनुर्विद्येसह विविध खेळांसाठीची मैदानं आणि सोयीसुविधांनी असणार आहेत. ५४० महिला आणि ५४० पुरुष खेळाडूंसह एकूण १ हजार ८० खेळाडूंना प्रशिक्षण देता येईल इतकी या विद्यापीठाची क्षमता असेल.