राष्ट्रीय कौशल्य परिषदेतर्फे आयोजित स्पर्धेत 200 पेक्षा जास्त सहभागी स्पर्धकांचा गौरव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयातर्फे आयोजित इंडीया स्किल्स २०२१ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवला आहे. विविध विभागात मिळून एकूण २७० स्पर्धकांना काल सन्मानपूर्वक पदकं प्रदान करण्यात आली. यात ६१ सुवर्ण, ७७ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांचा समावेश आहे. याखेरीज विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल एकोणऐंशी पदकं देण्यात आली. ओदिशा ५१ पदकं मिळवून प्रथम क्रमांकावर आहे तर महाराष्ट्राने ३० आणि केरळाने २५ पदकं मिळवली. कार रंगवणे, सायबर सुरक्षा, पेस्ट्री आणि कन्फेक्शनरी, वेल्डींग, पुष्परचना अशा ५४ विविध गटात ही स्पर्धा झाली. कौशल्यविकास मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितलं की येत्या ऑक्टोबरमधे चीनच्या शांघाय शहरात होऊ घातलेल्या जागतिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या स्पर्धकांना मिळणार आहे.