परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आल्यावर RTPCR चाचणी बंधनकारक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारातले विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विमानतळांवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार विमानतळावर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RTPCR चाचणीला सामोरं जावं लागेल. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या प्रवाशांना १४ दिवस घरी विलगीकरणात रहावं लागेल तर पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांना रुग्णालयात भरती व्हावं लागेल. युरोप, ब्रिटन, चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बोत्सवाना, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बॉब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्राइलमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस संस्थांत्मक विलगीकरणात रहावं लागेल. या काळात दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी त्यांनी RTPCR चाचणी होईल. ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्यांना रुग्णालयात भरती केलं जाईल अन्यथा आठवड़ाभर घरीच विलगीकरणात रहावं लागेल. आंतरराष्ट्रीय प्रवास करुन राज्यातल्या विमानतळावर उतरणाऱ्या आणि लगेच पुढचे विमान पकडण्य़ाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनाही RTPCR चाचणीला सामोरं जावे लागेल. रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच त्यांना पुढचं विमान पकडता येईल. देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही ४८ तास आधीचा RTPCR चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. लसीकरण पूर्ण न झालेल्या आणि राज्यांतर्गत विमान प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांनाही RTPCR चाचणीचा ४८ तास आधीचा अहवाल देणं बंधनकारक आहे. या सर्व नियमावलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोंदणी आणि स्वॅब घेण्यासाठी प्रत्येकी ४० केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लगेच पुढचं विमान पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांसाठी ३० रॅपिड पीसीआर मशीनही उपलब्ध आहेत.