आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत आश्वासन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असं आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. कोविड परिस्थितीमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून, तातडीनं कर्जमाफी देता येणार नाही, असंही पवार म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला होता. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली तर त्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज देणार असल्याचंही पवार म्हणाले. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात सर्व पात्र शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज वाटप केलं नाही, केवळ नऊ कोटी कर्ज वाटप केलं असल्याचं सांगून आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी, वेळेवर कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांवर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला. मात्र सेनगाव तालुक्यातून अशा प्रकारची कुठलीही तक्रार आली नसल्याचं सरकार कडून सांगण्यात आलं. पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं एक जानेवारी रोजी शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार असल्याचं, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितलं. एक जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा प्रशासनाला निधी उपलब्ध करुन दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.