राज्यात ओमायक्रॉनचे काल आणखी ६ रुग्ण आढळले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओमायक्रॉन संसर्ग झालेले काल आणखी सहा रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यात या रुग्णांची संख्या आता ५४ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांपैकी मुंबईत विमानतळावरच्या तपासणी दरम्यान चार रुग्ण आढळले, यापैकी एक रुग्ण औरंगाबादचा आहे. उर्वरित तीन रुग्णांपैकी दोन कर्नाटकचे तर एक मुंबईचा रहिवासी आहे. या सर्वांचं कोविड लसीकरण पूर्ण झालेलं असून, त्यांच्यात संसर्गाची कोणतीही लक्षणं नाहीत. या सर्वांना मुंबईत सेवन हिल्स रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघे टांझानियातून तर दोघे इंग्लंडहून आले आहेत. बाकी दोन रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर इथल्या पाच वर्षीय बालकाचा तर पिंपरी चिंचवड इथल्या ४६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यापैकी बालकाचं लसीकरण झालेलं नाही, तर दुसऱ्या रुग्णाचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्येही संसर्गाची लक्षणं दिसत नसल्याचं, आरोग्य विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे.