मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

  मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई : मुंबईच्या विकासासाठी सुरू असलेले विविध पायाभूत सुविधा प्रकल्प दर्जेदार आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, या अनुषंगाने पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे या प्रकल्पांचा नियमित आढावा घेतात. आज त्यांनी दहिसर चेक नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविणे, वरळी-शिवडी जोडरस्ता तसेच माहिम किल्ला परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास या कामांचा सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

पश्चिम एक्सप्रेस हायवेवर मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेक नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांसाठी मंत्री श्री.आदित्य ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. आज त्यांनी एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांसमवेत या कामांचा आढावा घेतला. येथे बहुतांश उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या आहेत. मेट्रो 9 पियर आणि रिसरफेसिंगचे सध्या सुरू असलेले काम पुढील काही दिवसांमध्ये पूर्ण झाल्यानंतर निश्चितच येथील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वरळी-शिवडी जोडरस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी नागरिक आणि प्रकल्पबाधितांच्या उपस्थित केलेल्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधितांना सूचना केल्या. हा प्रकल्प मध्य मुंबईतील वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड सोबतच पूर्ण होणे गरजेचे असल्याने कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

माहिम रेतीबंदर परिसराचा नुकताच पर्यटनदृष्ट्या कायापालट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माहिम किल्ल्याचाही विकास करण्यात येणार आहे. या अनुषंगानेही आज मंत्री आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली.

या बैठकीस आमदार सर्वश्री सदा सरवणकर, अजय चौधरी, नगरसेवक श्रीमती श्रद्धा जाधव, श्रीमती उर्मिला पांचाळ, समाधान सरवणकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. सत्यनारायण, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.