तंत्रज्ञान किंवा नवोन्मेष आत्मसात करण्यात आपण कुणाच्याही मागं नसल्याचं भारतानं जगाला दाखवून दिलं - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञान किंवा नवोन्मेष आत्मसात करण्यात आपण कुणाच्याही मागं नसल्याचं भारतानं जगाला दाखवून दिलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज इन्फीनिटी फोरमचं दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. डिजिटल इंडिया अंतर्गत उचललेल्या परिवर्तनशील पावलांमुळे भारतानं राज्यकारभारात उपयुक्त  वित्तीय तंत्रज्ञानाच्या नव्या कल्पनांना आपली दारं खुली केली आहेत, असं ते म्हणाले.

फिन्टेक अर्थात वित्तीय तंत्रज्ञानानं देशात खूप संधी निर्माण केल्या आहेत, आणि आता फिन्टेक क्रांतीची वेळ आली आहे. ही क्रांती देशातल्या प्रत्येक नागरिकाचं वित्तीय सक्षमीकरण करण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल. उत्पन्न, गुंतवणूक, विमा आणि संस्थात्मक पत या चार खांबांवर वित्तीय तंत्रज्ञान अवलंबुन आहे. भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधानिषयक उपाययोजना जगभरातल्या नागरिकांच्या आयुष्यात सुधारणा घडवू शकतात. गेल्यावर्षी पहिल्यांदाच एेटीएमद्वारे पैसे काढण्यापेक्षा मोबाईल पेमेंट वाढलेलं दिसलं. पूर्णपणे डिजिटल बँका ही गोष्ट सत्यात उतरली आहे, आणि दशकभरापेक्षा कमी काळात ही लवकरच सामान्य बाब बनेल, असं ते म्हणाले.

गिफ्ट सिटी, अर्थात गुजरात आंतरराष्ट्रीय आर्थिक तंत्रज्ञान शहर आणि ब्लूमबर्गच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. भारत सरकारच्या देखरेखीखाली होत असलेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटन भागीदार देश आहेत. फिनटेकशी संबंधित पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि समावेशक विकासासाठी याचा उपयोग करण्यासाठी या दोन दिवसांच्या परिषदेच्या माध्यमातून एक मंच उपलब्ध झाला आहे. बियॉन्ड ही या परिषदेची संकल्पना आहे. यामध्ये इन्फिनिटी फोरम, व्यापार आणि तंत्रज्ञान विश्वातील आघाडीचे लोक सहभागी होणार आहेत. स्पेसटेक, ग्रीनटेक, ऍग्रीटेक, क्वांटम कंप्युटिंग सारख्या नव्या कलांविषयी यामध्ये विचारमंथन होणार आहे.