गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून दोषी पोलिसांवर योग्य ती कारवाई केली जाईल, उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिसांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाकडे एका स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे लक्ष वेधलं होतं. या प्रकरणी संबंधित दोषी पोलिसांना निलंबित करावं तसंच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांना निलंबित करावे, अशी मागणी शिवसेनेचे सदस्य सुहास कांदे तसेच सुनील प्रभू यांनी केली. भास्कर जाधव यांनीही या विषयावर भाष्य केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा नितेश राणे यांना निलंबित करण्याचा डाव असल्याचे सांगत तसे झाल्यास आम्ही त्याविरूद्ध लढण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी दोन्ही बाजूंनी सदस्य आक्रमक झाल्यामुळे सभागृहाचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झालं होतं.