पुणे जिल्ह्यात वढु बुद्रुक येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्र्यांची तत्वत: मंजुरी

 

पुणे : पुणे जिल्ह्यात वढु बुद्रुक इथं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मंजुरी दिली. यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत ही मंजुरी दिल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं हे प्रस्तावित स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारं, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं, भव्य दिव्य असलं पाहिजे, त्याला ‘हेरिटेज’ टच असावा, संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तुरचनांचा आधार घ्यावा. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचं आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करावी, स्मारकाचं काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घेऊन काम करावं, अशा सूचना पवार यांनी दिल्या. वढु बुद्रुक इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी, दरवर्षी लाखो नागरिक येतात. त्यांना सोयी- सुविधा उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.