नाशिकमधे आजपासून अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आज सकाळी टिळकवाडी इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयातून निघालेल्या ग्रंथ दिंडीनं संमलेनाला प्रारंभ झाला. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यावेळी उपस्थित होते. या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थ्यांसह, विविध ढोल - लेझीम आणि नृत्य पथकं मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात या ग्रंथदिडीचा समारोप झाला. या संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनही स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं.  संमेलनामध्ये प्रथमच चित्र-शिल्प अशा प्रकारचे वेगळे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याचे  उद्घाटन चित्रकार विजयराज बोधनकर तसेच भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं. नाशिकच्या संमेलनाने हा अनोखा पायंडा पाडला असल्याचं बोधनकर यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान या संमेलनासाठी सर्व प्रकारच्या नियमांची दक्षता घेण्यात येत आहे. प्रवेशद्वारावर लसीकरण झालेल्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाचीही व्यवस्था संमेलनात करण्यात आली आहे. सुमारे दीडशे ग्रँथ प्रदर्शनाचे स्टॉल्स याठिकाणी उपलब्ध आहेत. संमेलन स्थळी जाण्यासाठी नाशिक महापालिकेच्या 50 ग्रीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते आज संध्याकाळी साडे चार वाजता संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे. संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन माध्यमातून, तर गीतकार जावेद अख्तर हे सोहळ्यात प्रत्यक्ष उपस्थित असणार आहेत. विविध युट्युब वाहिन्या आणि फेसबुक पेजवरूनही या सोहळ्याचं थेट प्रसारण केलं जाणार आहे.

 

 

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image