कोरोना प्रादुर्भाव प्रकरणी राज्यांच्या उपाययोजनांना केंद्रीय यंत्रणांनी मदत करून 'एक सरकार' असा दृष्टीकोन बाळगावा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उच्चस्तरीय बैठकीत सूचना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व पातळ्यांवर अत्यंत दक्षता बाळगण्याचे आदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले. प्रधानामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल उच्चस्तरीय बैठक झाली यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे, अश्या  राज्यांच्या उपाययोजनांना केंद्रीय यंत्रणांनी मदत करून 'एक सरकार' असा दृष्टीकोन बाळगावा, अशी सूचना त्यांनी केली. कोरोनाविरोधातली लढाई अद्याप संपलेली नसल्यानं कोरोना नियमांचं पालन करण्यावर भर दिला जावा. नव्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी जिल्हा पातळीपर्यंतची आरोग्य यंत्रणा मजबूत करावी. राज्यांच्या यंत्रणेबरोबर समन्वय राखावा, असंही प्रधानमंत्री म्हणाले. कोरोना संसर्ग रोखण्याच्या आणि परिस्थितीचं व्यवस्थापन करण्याबाबतच्या उपाययोजनांचा, तसंच आरोग्य यंत्रणेचा आणि लसीकरण मोहिमेचा त्यांनी आढावा घेतला. कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी जनतेनं सतर्क आणि सावधान रहावं. अशा सूचनाही प्रधानामंत्र्यांनी केल्या.