कुन्नुर इथल्या हेलिकॉप्टर अपघाताची तिन्ही सेनादलाच्या संयुक्त पथकाकडून चौकशी होणार - राजनाथ सिंग

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कुन्नुर इथल्या दुर्घटनेसंदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिलं. याप्रकरणी एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलं मिळून संयुक्त चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. रावत यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील असं त्यांनी सदनाला सांगितलं. बिपीन रावत वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा महाविद्यालयातल्या प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी जात होते. काल सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी सुलुरच्या हवाई दलाच्या तळावरुन त्यांना घेऊन जात असलेल्या हवाई दलाच्या MI 17-V 15 या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं. सव्वा बारा वाजता ते वेलिंग्टनला पोहोचणं अपेक्षित होतं. १२ वाजून ८ मिनिटांनी या हेलिकॉप्टरचा सुलुर तळाशी संपर्क तुटला. त्याच दरम्यान काही स्थानिकांनी कुन्नूर जवळच्या जंगलात आग लागल्याचं पाहिलं आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी आगीच्या झोतात लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष त्यांना आढळून आले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदत आणि बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन हेलिकॉप्टरमधल्या प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं.

या अपघातात संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, त्यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर लखबिंदर सिंग लिड्डर, अधिकारी लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग,  आणि लष्करातले इतर ९ जण होते. या अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग सध्या लष्कराच्या वेलिंग्टन इथल्या रुग्णालयात जीवरक्षक प्रणालीवर आहेत. त्यांना एम्बुलन्समधून सुलुरच्या हवाई तळावर हलविण्यात आलं आहे. तिथून हवाई अम्बुलन्सनं बेंगळुरूच्या लष्करी रुग्णालयात त्यांना हलविण्यात येणार आहे. यासंदर्भात राजनाथ सिंह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही माहिती देणार आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज २ मिनिटं मौन पाळून संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी शोक संदेश वाचून दाखवला. देशानं एक महान सेनानी गमावल्याचं ते म्हणाले. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून रावत यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्यासह, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज कुन्नूर इथं कालच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या ठिकाणाची पाहणी केली. यासोबतच अपघातासंबंधीचे पुरावे गोळा करण्यासाठी न्यायवैद्यक पथकही दाखल झालं आहे. या पथकाला अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स सापडला असल्याचं वृत्त आहे.