भारतानं १२८ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत ५० टक्क्याहून अधिक लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोविड प्रसार रोखण्यासाठी जनतेनं प्रतिबंधक नियमाचं पालन करावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरून केलं आहे. दरम्यान लसीकरण मोहीमेच्या आज ३२५ व्या दिवशी भारतानं १२८ कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. देशभरात आज दुपारपर्यंत ३४ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२८ कोटी ३० लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ४७ कोटी ८७ लाखाहून अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. राज्यातही आज दुपारपर्यंत लसींच्या ४ लाखांहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत राज्यभरातल्या लाभार्थ्यांना एकूण ११ कोटी ८६ लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ४ कोटी २६ लाखाहून अधिक नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.