15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंबंधी केंद्राची नियमावली जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी, तसंच आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कोरोना योद्धे आणि 60 वर्षांवरच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना वर्धक मात्रा देण्यासंबंधीची नियमावली केंद्र सरकारनं काल जारी केली. त्यानुसार 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी एक जानेवारीपासून कोविन अँपवरून नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी दहावीचं ओळखपत्र नोंदणीसाठी वैध कागदपत्र म्हणून अंतर्भूत करण्यात आल्याची माहिती कोविन अँप प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा यांनी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र नसतील त्यांच्यासाठी ही सुविधा देण्यात आल्याचं शर्मा यांनी सांगितलं. सहव्याधी असतील तर नोंदणी करताना त्याबाबतचं प्रमाणपत्र दाखवावं लागेल. त्यानंतरच संबंधित युवक युवतीला लसीची मात्रा देण्यात येईल असंही शर्मा यांनी सांगितलं. 15 ते 18 वयोगटासाठी येत्या 3 जानेवारी पासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. मात्र या लाभार्थ्यांना केवळ कोव्हॅक्सिन याच लसीचा पर्याय उपलब्ध असेल. त्यांना इतर कोणतीही दुसरी लस घेता येणार नाही. त्याशिवाय, 60 वर्षापुढच्या ज्येष्ठ नागरिकांना दुसरी मात्रा घेतल्यानंतर नऊ महिन्यांनी वर्धक मात्रा घेता येणार असल्याचंही शर्मा यांनी सांगितलं. वर्धक मात्रा घेतल्याची नोंद लसीकरण प्रमाणपत्रावर करून दिली जाणार असल्याचंही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.