२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांना विविध मान्यवरांसह देशाची आदरांजली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदरांजली वाहिली. सुरक्षा दलातल्या ज्या जवानांनी कर्तव्य बजावताना शौर्य दाखवून हौतात्म्य पत्करलं त्याबद्दल देश सदैव त्यांचा ऋणी राहील असं ते म्हणाले. आज या हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांप्रतीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्या सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांचा शौर्यानं मुकाबला केला त्यांना मी सलाम करतो अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भावना व्यक्त केल्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पोलीस बँड तुकडीनं सलामीधुन वाजवली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री शंभू राजे देसाई उपस्थित होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केलं. मुंबईवरील हल्ला हा भारताच्या आर्थिक राजधानीवरील हल्ला होता, देशाच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न मुंबईकरांनी उधळून लावला, त्यामध्ये मुंबई पोलीसांनी शौर्याची परिसीमा गाठली, असं ते म्हणाले. शौर्य, धैर्य आणि समर्पणासमोर नतमस्तक होण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्यात इतरत्रही अनेक ठिकाणी शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.