संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारनं उच्च न्यायलयात योग्य बाजू मांडली आहे. न्यायालयानं देखील त्याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे, म्हणून सरकारनं यावर तोडगा काढण्यासाठी विशेष समिती नेमली आहे. या समितीनं आपलं काम सुरू देखील केलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोरोनातून आता कुठे आपण सावरतोय, त्यामुळे शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा, सर्वसामान्य प्रवाशांना वेठीला धरणारं आंदोलन करू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी, युनिअनचे नेते यांना केली आहे. तसंच या प्रकरणात कोणी राजकारण आणू नका, असंही मुख्यमंत्री म्हणाले.