कोविड प्रतिबंधक लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाविन्यपूर्ण मार्ग स्वीकारायची गरज - नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग स्वीकारायची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर आयोजित आढावा बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. शंभर टक्के लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी सरकार ‘हर घर दस्तक’ कार्यक्रमा अंतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावर भर देत असल्याचं ते यावेळी म्हणाले. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप ५० टक्क्यापेक्षा कमी लसीकरण झालं आहे आणि लसीचा  दुसरा डोस घेणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे, त्यांनी लसीकरणाबाबतच्या जनजागृतीकडे विशेष लक्ष द्यायला हवं असं म्हणाले. लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी तसंच याबाबतच्या अफवांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनांनी धार्मिक नेत्यांच्या माध्यमातून योग्य संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा तसंच लसीकरण कार्यक्रमात NCC आणि NSS कॅडेट्सची मदत घ्यावी  असं ते म्हणाले. दरम्यान,राज्यात लसीकरण कमी असलेल्या तीन जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आजच्या बैठकीत सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन कवच कुंडल’ अभियान राबवून लसीकरण औरंगाबाद जिल्हात लसीकरण  वाढवल्याचं जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या बैठकीत सहभागी झाले.