देशभर संविधान दिन विविध कार्यक्रमांनी होतोय साजरा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ नोव्हेंबर. म्हणजेच संविधान दिन. देशभर हा दिवस आज विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. आज सकाळी देशभर राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्य कार्यक्रम झाला.यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन केलं. ही राज्यघटना सर्व भारतीयांना जोडणारी आहे. भारताची विकासयात्रा या राज्यघटनेच्या ताकदीवरच जोमानं सुरु आहे, असं ते म्हणाले. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, इतर केंद्रीय मंत्री, खासदार तसंच वेगवेगळ्या देशांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यघटनेच्या तत्वज्ञानाचं सार घटनेच्या उद्देशिकेत आहे. त्यात भारत, हा लोकशाही प्रजासत्ताक बनण्याला प्राधान्य दिलं आहे, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. विकासाच्या केंद्रस्थानी जनता असेल हे आपलं तत्व आहे, असं ते म्हणाले. भारतीय राज्यघटनेतल्या उच्च मूल्यांचं रक्षण करणं आणि आपल्या जीवनात त्यांचं महत्त्व किती आहे, याबाबत आत्मपरीक्षण करणं ही नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं. अनेक भिन्नता असलेल्या आपल्या देशाला राज्य घटनेनं एकत्र बांधून ठेवलं आहे. राज्य घटना हा केवळ अनेक कलमांचा संग्रह नव्हे, तर ते हजारो वर्षांचं संचित आहे, असं ते म्हणाले. संविधान दिवस हा अनेक भारतीय नेत्यांच्या विचार मंथनातून संविधान देणाऱ्या या सभागृहाला वंदन करण्याचा दिवस आहे. राज्य घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद यांना मानवंदना देण्याचा हा दिवस आहे असं ते म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांना त्यांनी आदरांजली वाहिली. २६/११ च्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तसंच दहशतवाद्यांशी लढताना शौर्य दाखवणाऱ्या सर्वांना विसरुन चालणार नाही, असंही प्रधानमंत्री म्हणाले. भारताची राज्य घटना प्रत्येकाला देशासाठी काम करण्याची प्रेरणा देते, असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यावेळी म्हणाले. आपल्यापैकी प्रत्येकानं देशासाठी काम करण्याचा निर्धार केला, तर एक भारत श्रेष्ठ भारत नक्कीच उभारता येईल, असं ते म्हणाले.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image