महाराष्ट्रात या महिनाअखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना किमान पहिली मात्रा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : दररोज विक्रमी संख्येनं कोविड प्रतिबंधक लस देण्याची राज्याची क्षमता असल्यानं लसीकरणाला अधिक गती देण्यासाठी, या महिनाअखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना किमान पहिली मात्रा देण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कोविड लसीकरण आढावा घेत असल्यानं त्यासंदर्भात काल विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत आयोजित पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. आपापल्या जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश त्यांनी दिले. समाजाच्या सर्व स्तरामधल्या आणि धर्मांमधल्या लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. कोरोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी टाळाटाळ न करता दोन्ही मात्रा घ्याव्यात, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.