देशव्यापी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने ओलांडला १०९ कोटींचा टप्पा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आजपर्यंत १०९ कोटी ४७ लाखापेक्षा जास्त मात्रा देऊन झाल्या आहेत. काल दिवसभरात एकोणसाठ लाख ८ हजार मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. काल कोविडचे १० हजार नवबाधित रुग्ण आढळले तर सुमारे १२ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. ३३२ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ३ कोटी ३७ लाख रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९८ पूर्णांक २५ शतांश टक्के झाला आहे. मार्च २०२० पासूनचा हा सर्वात जास्त दर आहे. सध्या देशात बाधासक्रीय रुग्णांची संख्या एक लाख ४० हजाराच्या आसपास असून गेल्या २६३ दिवसातली ही सर्वात कमी संख्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. कोविड-१९ साठी ६१ कोटी ७२ लाख चाचण्या देशभरात आतापर्यंत झाल्या असून त्यातले १० लाख ८५ हजार नमुने काल तपासण्यात आले.