२०२२ मधे भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ९ पूर्णांक ३ दशांश टक्के राहण्याचा मूडीचा अंदाज

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची आर्थिक वाढ अत्यंत जोमानं होईल, असं अनुमान मूडी या मानांकन संस्थेनं व्यक्त केलं आहे. २०२२ मधे भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ९ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील, असा अंदाज मूडीच्या गुंतवणूकदार सेवेच्या ताज्या अहवालात व्यक्त केला आहे. २०२३ मधे हा दर ७ पूर्णांक ९ दशांश टक्के राहील, असं त्यात म्हटलंय. कोविड प्रतिबंधक लसीकरणात सातत्यानं प्रगती होत असल्यानं भारताची अर्थव्यवस्था पूर्ववत होण्यासाठी मदत मिळेल. लसीकरणाच्या संरक्षणामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास टिकून राहिला आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानं ग्राहक मागणी, खर्च आणि उत्पादन यामधे सुधारणा होत असल्याचं दिसत आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.