राज्यातल्या शाळा ठरल्याप्रमाणे एक डिसेंबरला सुरू होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शाळा ठरल्याप्रमाणे एक डिसेंबरला सुरू होतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ओमायक्रॉनची राज्यात कुठेही लागण झाल्याचं अजून आढळलेलं नाही. त्यामुळे चिंतेचं कुठलंही कारण नसल्याचं ते म्हणाले. शाळा सुरू कारण्यासंदर्भातला निर्णय मुलांसाठीच्या कृती दलाशी चर्चा करूनच घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नव्या व्हेरियंटबाबत जागतिक आरोग्य संघटना अभ्यास करत आहे. ओमायक्रॉनची संसर्गाची गती पाचपट असल्याच्या पार्श्ववभूमीवर खबरदारी बाळगणं आवश्यकच आहे. कापडी मास्क वापरण्यापेक्षा सर्जिकल मास्कचा सल्ला देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. चाचण्या वाढवण्यावर भर देण्यात आला असून जिनोमिक सिक्वेन्सच्या प्रयोगशाळा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. 12 देशातून आलेल्या नागरिकांना 48 तास आधीचा RTPCR चाचणी अहवाल निगेटीव्ह असणं बंधनकारक आहे. तसंच 7 दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक असेल.