लोकशाही ही भारतात केवळ एक प्रक्रिया नसून देशाच्या कानाकोपऱ्यात आणि कणाकणात भिनलेली असल्याचं प्रधानमंत्री याचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाही ही भारतात केवळ एक प्रक्रिया नसून देशाच्या कानाकोपऱ्यात आणि कणाकणात भिनलेली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. विधीमंडळ अध्यक्षांच्या ८२ व्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आगामी २५ वर्ष देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यासाठी सर्वांनी कर्तव्य या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करावं असं आवाहन त्यांनी लोकप्रतिनिधींना केलं. देशाला नव्या पातळीवर घेऊन जायचं आहे. येत्या काळात अतुलनीय ध्येय साध्य करायची आहेत, असं ते म्हणाले. सर्वांच्या प्रयत्नातून हे साध्य होणार आहे आणि त्यात राज्यांची भूमिका मोठी आहे. यावेळी बोलताना प्रधानमंत्र्यांनी ‘एक देश एक विधीमंच’ ही संकल्पना मांडली. यामुळं देशातल्या लोकशाही व्यवस्थेला तांत्रिक पाठबळ तर मिळेलच पण यातून देशातल्या सर्व लोकशाही यंत्रणा एकाच व्यासपीठावर येऊ शकतील, असं ते म्हणाले. आपला देश विविधतेने भरलेला आहे. विकासाच्या हजारो वर्षांत आपल्या सर्वांच्या लक्षात एक गोष्ट आली आहे की, या विविधतेत एकता आहे आणि ती टिकवली पाहिले, असंही प्रधानमंत्री म्हणाले. देशातल्या लोकप्रतिनिधीगृहांमध्ये वर्षातले ३-४ दिवस समाजासाठी काही करणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी राखून ठेवावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. यामुळं त्यांचं समाजकार्य समाजासह लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचायला मदत होईल. दर्जेदार चर्चांसाठी विशेष वेळ राखून ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यात कुठलेही राजकीय आरोप प्रत्यारोप होणार नाहीत तर गंभीर आणि सन्मानपूर्वक चर्चा होतील, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.