देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांची निवड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांची निवड केली आहे. सध्या त्यांच्याकडं नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ अशी जबाबदारी आहे.विद्यमान नौदल प्रमुख अॅडमिरल करमबिर सिंह या महिन्याच्या ३० तारखेला सेवानिवृत्त होत आहेत. व्हाईस अॅडमिरल हरी कुमार हे १९८३ मध्ये नौदलात दाखल झाले होते. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी नौदलात अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे.