निलंबन मागं घेण्याची मागणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेतल्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केलेलं आवाहन राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या नियमबाह्य वर्तनाबद्दल या १२ सदस्यांना सध्या सुरु असलेल्या अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव काल संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी मांडला होता आणि राज्यसभेत मंजूर केला होता. हा निर्णय सभागृहानं घेतलेला आहे, मी घेतलेला नाही असं नायडू यांनी सांगितलं. या सदस्यांनी त्यांच्या वर्तनाबद्दल साधी दिलगीरीही व्यक्त केलेली नाही, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध केलेली कारवाई अंतिम आहे, असं ते म्हणाले. त्यावर काँग्रेस, आप आणि राष्ट्रीय जनता दलासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केली, नंतर विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. काल निलंबित केलेल्या १२ विरोधी पक्ष सदस्यांनी त्यांच्या सभागृहातल्या वर्तनाबद्दल माफी मागितली तरच त्यांचं निलंबन मागं घेतलं जाईल, असं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज संसद भवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते. या खासदारांना याआधीही दिलगीरी व्यक्त करण्याची संधी दिली होती, मात्र त्यांनी ती गमावली असं ते म्हणाले. खासदारांच्या अशा वर्तनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे का असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विचारलं असता संसदीय कार्यमंत्री म्हणाले, की गेल्या सात वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषीक्षेत्राला शक्य तेवढी जास्तीत जास्त मदत केली आहे. राज्यसभेच्या १२ सदस्यांचं निलंबन रद्द करावं या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली. हे निलंबन दुर्दैवी असून ते मागं घ्यावं असं आवाहन काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी केलं. या खासदारांविरुद्धची कारवाई लोकशाहीच्या तत्वांशी विसंगत आहे असं सांगत हे निलंबन रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांनी केली. त्याआधी या मुद्द्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधल्या काँग्रेस, शिवसेना, द्रमुक, नॅशनल काँन्फरन्स इत्यादी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.