शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपण एकत्र राहून पार पाडू - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपण एकत्र राहून पार पाडू असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिक्षकांना केलं. आजपासून  शाळा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर ,मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून निवडक  शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आता सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायच्या नाहीत या अनुषंगानं कोविड प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं असं ते म्हणाले. वर्ग बंदिस्त असता कामा नये, वर्गात हवा खेळती असायला हवी, शौचालयांची  स्वच्छता, वर्गांचे निर्जंतुकीकरण व्यवस्थित झाल्याची  खात्री करून घ्या असं त्यांनी शिक्षकांना सांगितलं. शाळा सुरु करण्याचा निर्णय अवघड होता मात्र अत्यंत काळजीपूर्वक हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेचे वर्ग प्रत्यक्ष सुरु झाल्याबद्दल विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गायकवाड यांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी मुंबईत सायन आणि कुलाबा इथल्या शाळांना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.आणि विद्यार्थ्यांना मास्क वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला. शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी सरकारनं जारी केलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन होणं आवश्यक आहे असं गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.