विदर्भात कोरोनामुळं काल एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली प्रामुख्यानं विदर्भातल्या कोरोना परिस्थितीमध्ये मोठ्या वेगानं सुधारणा होताना दिसते आहे. काल विदर्भात केवळ ७ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. अकोला शहरात ३ आणि यवतमाळ, बुलढाणा, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. विदर्भात काल एकाही रुग्णाचा कोरोनामुळं मृत्यू झाला नाही.मालेगाव शहर आणि धुळे, नंदूरबार, परभणी, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काल एकाही कोरोनाबाधिताची नोंद झाली नाही. नंदूरबारमध्ये सध्या एकाही कोरोना बाधितावर उपचार सुरू नाहीत तर धुळ्यात ३, वाशिममध्ये ७, यवतमाळमध्ये ८, वर्ध्यात ४, भंडाऱ्यात १, गोंदियात ३, गडचिरोलीत ५ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. सध्या राज्यात २८ हजार ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.काल राज्यात १ हजार ४८५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल राज्यात २७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सर्वाधिक १७ मृत्यू पुणे विभागात झाले. काल राज्यातल्या एकूण ६१ महापालिका आणि जिल्ह्यांपैकी ५० ठिकाणी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, असं राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे.