भारताने आठव्यांदा पटकावले सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सॅफ अर्थात, दक्षिण आशियायी फूटबॉल संघाच्या स्पर्धेत काल रात्री माले इथे झालेल्या अंतिम सामन्यात नेपाळवर ३-० अशी मात करत भारताने आठव्यांदा या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. सामना सुरु झाल्यानंतर एकोणपन्नासाव्या मिनिटाला कर्णधार सुनील छेत्रीने पहिला गोल झळकवला. याबरोबरच त्याने लियोनल मेसीच्या ८० आंतरराष्ट्रीय गोलची बरोबरी केली. तसेच तो, सध्या खेळत असलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंमधला दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च गोलसंख्या नोंदवणारा खेळाडू ठरला. मेसीने ८० गोल १५५ सामन्यांमध्ये केले होते, तर छेत्रीने ही संख्या १२५ सामन्यात गाठली आहे. सर्वाधिक ११५ गोलचा विक्रम क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नावावर आहे. त्याच्या या गोलनंतर थोड्या वेलातच सुरेशसिंग वांगजमने दुसरा गोल नोंदवला, तर खेळ संपण्याच्या फक्त दोन मिनिटाआधी साहल अब्दुल समदने तिसरा गोल नोंदवला. या स्पर्धेत भारत अजिंक्य राहिला. बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध भारताचे सामने बरोबरीत सुटले, तर नेपाळ आणि मालदीवचा भारताने पराभव केला. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी या विजेते पदाबद्दल भारतीय फुटबॉल संघाचं अभिनंदन केले आहे. तसेच सुनील छेत्रीने मेसीच्या विक्रमाशी बरोबरी केल्याबद्दल त्याची प्रशंसा केली आहे.