कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सवाच्या राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी नौरोत्सवाच्या सणासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. यासूचनांनुसार राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत लागू असलेल्या कोरोनाप्रतिबंधक नियमावलीचं, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक असणार आहे. याशिवाय उत्सवासाठी मंडळांना महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं, संबंधित स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसारच मंडपांची उभारणी करणं बंधनकारक असेल. सार्वजनिक उत्सवासाठी देवीच्या मूर्तीकरता जास्तीत जास्त ४ फूट तर घरगुती देवीच्या मूर्तीकरता २ फुट उंचीची मर्यादा असेल. याशिवाय घरगुती उत्सवात शक्यतो धातूची मूर्ती वापरावी, शाडूची मुर्ती असल्यास घरीच विसर्जन करावं, तसं शक्य न झाल्यास स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करावं असं शासनानं सूचवलं आहे. उत्सवाच्या काळात गरबा आणि दांडियाच्या आयोजनाला, तसंच आगमन आणि विसर्जनासह कोणत्याही प्रकारच्या मिरवणूकांना मनाई असणार आहे. देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये याकरता ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे. कोणत्याही धार्मिक विधी वा कार्यक्रमांसाठी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. गर्दी होणारे विधी आणि कार्यक्रम टाळून त्याऐवजी आरोग्य आणि स्वच्छतेविषयक उपक्रम राबवावेत असंही या सूचनांमध्ये म्हटलं आहे.  दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाच्या कार्यक्रम किमान लोकांच्या उपस्थितीत करायला परवानगी असून, प्रेक्षकांना आमंत्रित करायला मनाई केली आहे.